नवी दिल्ली - केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरील निर्बंधात आणखी वाढ केली आहे. कोरोनाच्या विषाणुचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात चिंता व्यक्त होत आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरील निर्बंध वाढविल्याचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार ३० जानेवारी २०२१ पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवेवर निर्बंध लागू राहणार आहेत. मात्र, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान वाहतुक सेवेचा समावेश नाही. असे असले तरी नियोजीत आंतरराष्ट्रीय विमान उड्डांणांना ठराविक विमान मार्गावर परवानगी असणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगीही लागणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा-टेस्ला पुढील वर्षी भारतात येणार- नितीन गडकरी
भारताने निवडक देशांशी एअर बबल करार करून विमान वाहतूक सेवा सुरू केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने टाळेबंदी घोषणा करताना २५ मार्च २०२० ला आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक सेवेवर निर्बंध लागू केले आहेत.