नवी दिल्ली - महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात यंदा रेल्वे बोगी निर्मीतीचा कारखाना सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी दिली. तसे भारतामध्ये चालकविरहित तयार करण्यात आलेली ट्रेन १८ ची विदेशातही निर्यात करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
देशातील ट्रेन १८ ची मागणी पूर्ण करण्याला रेल्वे मंत्रालय प्राधान्य देणार आहे. त्यानंतर दक्षिण अमेरिकेसह दक्षिण आशियातील देशांना रेल्वे १८ विकली जाणार आहे. या देशांनी रेल्वे १८ खरेदी करण्यात रस दाखविल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी दिली. पुढे ते म्हणाले, इंटिग्रेट कोच उत्पादन प्रकल्पात ६० हजार बोगींची निर्मिती करण्यात आली आहे. आयसीएफ (इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी) भविष्यात ४० अशा 'ट्रेन १८' ची निर्मिती करणार आहे.
ट्रेन १८ ही देशातील पहिली स्वयंचलित रेल्वे आहे. ही रेल्वे सध्या नवी दिल्ली ते वाराणशी मार्गावर सुरू आहे. या रेल्वेचे वंदे मातरम एक्सप्रेस असे नामकरण करण्यात आले आहे. या रेल्वेची स्लीपरसाठीही निर्मिती होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी लातूरमध्ये रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. या कारखान्यामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, अशी महाराष्ट्र सरकारला अपेक्षा आहे.