नवी दिल्ली - देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना खूश करणारा निर्णय घेतला आहे. इन्फोसिसच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर ५ कोटींचे शेअर देण्याचा निर्णय मंजूर केला आहे. हे शेअर चांगली कामगिरी करणाऱ्या इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांना १० कोटींचे शेअर देण्यात येणार आहेत.
कंपनी कायद्याच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे शेअर जास्तीत ५ कोटी असणार आहेत. या निर्णयाने नव्या कर्मचाऱ्यांना आकर्षित केले जाईल. तसेच चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कंपनीमधील मालकी वाढवली जाईल, असे इन्फोसिसने म्हटले आहे.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार कोट्यवधींचे शेअर-
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांना १० कोटींचे शेअर देणार असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. कंपनीचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर यू.बी. प्रविण यांना ४ कोटींचे प्रोत्साहनपर शेअर देण्यात येणार आहेत.
चांगल्या गुणवान लोकांना प्रतिष्ठा देण्याचा वारसा संस्थापकांनी कंपनीला दिला आहे. त्याचाच भाग म्हणून प्रोत्साहनपर शेअर देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांसाठी संपत्ती निर्मिती करण्याचे कंपनीचे प्रयत्न असल्याचे इन्फोसिसने म्हटले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले, आमचे कर्मचारी ही आमची सर्वात मोठी मालमत्ता आहे. या कार्यक्रमातून आम्ही त्यांना बक्षीस देत आहोत. कर्मचाऱ्यांना मालक करून त्यांना दीर्घकाळासाठी फायदा घेण्याची संधी देत असल्याचेही पारेख म्हणाले.
कंपनीत आहेत २ लाखांहून अधिक कर्मचारी-
इन्फोसिच्या कर्मचाऱ्यांची एकूण २ लाख २८ हजार एवढी संख्या आहे. डिजीटल कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनर योजना राबविली जाणार असल्याचे इन्फोसिसने एप्रिलमध्ये जाहीर केले होते. तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या संधी मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही इन्फोसिसने म्हटले होते.