नवी दिल्ली - विश्वकरंडक चषक स्पर्धेतील भारतीय संघाचे सामने पावसामुळे रद्द होवू नयेत, असे चाहते अपेक्षा करतात. त्याप्रमाणे विमा कंपन्यादेखील पावसाचा भारतीय संघाच्या खेळात व्यत्यय होवू नये, अशी अपेक्षा करत आहेत. कारण भारतीय संघाचा सामना रद्द झाल्यास विमा कंपन्यांना १०० कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय संघ चार सामने खेळणार आहे. जर त्यापैकी एकही सामना पावसाने रद्द झाल्यास विमा कंपन्यांना प्रसारण वाहिनीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. यापूर्वी भारताचा न्यूझीलंडविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला होता.
या कंपन्यांचा आहे विमा-
न्यू इंडिया इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स आणि ओरिएंटल इन्शुरन्स या कंपन्यांनी क्रिकेटच्या सामन्यांवर विमा दिला आहे. या विमा कंपन्या क्रिकेटचे प्रक्षेपण करणाऱ्या प्रसारण वाहिन्यांना नुकसान भरपाईच्या दाव्यांची रक्कम देणार आहेत.
एवढी आहे विम्याची रक्कम-
पावसाची शक्यता अजूनही असल्याने भारतीय विमा कंपन्यांवर १०० कोटींची जोखीम (रिस्क) आहे. भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यासाठी ५० कोटींचा विमा उतरविण्यात आला होता. विविध सामन्यावर ५ कोटी ते ५० कोटीपर्यंतचा विमा उतरविण्यात आलेला आहे. तर उपांत्यपूर्व आणि अंतिम सामन्यासाठी ७० ते ८० कोटीपर्यंतचा विमा उतरविण्यात आला आहे.
आयसीआयसी लोंबार्ड जनरल इन्शुरन्सचे मुख्य संजय दत्त म्हणाले, की विश्वचषक सामन्यात अजूनही महत्त्वाचे सामने खेळायचे बाकी आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांवर आर्थिक जोखमीची मोठी जबाबदारी आहे. जाहिरातीपासून मिळणार उत्पन्न आणि पावसामुळे घटणारे आर्थिक उत्पन्न या बाबींवर भारतीय विमा कंपन्या जोखीम स्विकारत आहेत.
स्टार इंडियाकडे आहेत प्रसारणाचे हक्क-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चँपियन ट्रॉफीचे २ सामने आणि विश्वकरंडक सामन्यांचे प्रक्षेपण करण्याचे हक्क स्टार इंडियाला हक्क विकले आहेत. त्यामध्ये टी-२० चा विश्वकरंडक सामन्याचाही समावेश आहे. त्यासाठी स्टार इंडियाकडून आयसीसीला १.९८ अब्ज कोटी डॉलर देण्यात येणार आहेत.