नवी दिल्ली - सोने खरेदीत आघाडीवर असलेल्या भारतात यंदा सोन्याची मागणी घटली आहे. देशातील सोन्याची मागणी तिसऱ्या तिमाहीत ३२ टक्क्यांनी घसरून १२३.९ टन झाली आहे. सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. ही माहिती जागतिक सोने परिषदने (डब्ल्यूजीसी) अहवालात दिली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिसऱ्या तिमाहीत (ऑगस्ट ते ऑक्टोबर) सोन्याची आयात ६६ टक्क्यांनी घसरली आहे. तिसऱ्या तिमाहीत देशामध्ये ८०.५ टन सोन्याची आयात झाली आहे. चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबरमध्ये सोने आयातीत घट होवून ४९६.११ टन आयात करण्यात आली. तर गतवर्षी जानेवारी ते सप्टेंबरमध्ये ५२३.९ टन सोन्याची आयात करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये सोन्याच्या किमती प्रति तोळा ३९ हजार ११ रुपये होती. सध्या सोन्याचा दर हा प्रति तोळा ३८ हजार ८०० रुपये आहे.
हेही वाचा-माझा विवेक आरसीईपीत सहभागी होण्याची परवानगी देत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
या कारणाने सोन्याची आयात घटली-
डब्ल्यूजीसी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम म्हणाले, दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी आणि तिसऱ्या तिमाहीत सोन्याची किंमत २० टक्क्यांनी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे. तर दुसरे कारण म्हणजे चीनसह भारतासारख्या देशात मंदावलेली अर्थव्यवस्था असल्याने ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम झाला आहे.
जेव्हा मागणी कमी असते, तेव्हा ग्राहकांकडून जुन्या सोन्याचा पुनर्वापर होतो. गतवर्षी ८७ टन जुन्या सोन्याचा पुनर्वापर करण्यात आला होता. यंदा केवळ पहिल्या नऊ महिन्यातच ९०.५ टन जुन्या सोन्याचा पुनर्वापर करण्यात आल्याचे सोमसुंदरम यांनी सांगितले. हे आजपर्यंतचे सर्वात अधिक जुन्या सोन्याच्या पुनर्वापराचे प्रमाण आहे. मागणी कमी झाल्याने तिसऱ्या तिमाहीत सोने खरेदीवर स्थानिक बाजारपेठेत मोठ्या सवलती देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-'आरसीईपीत सहभागी न झाल्याने भारतीय उद्योगांसह शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल'
सोन्याच्या किमती वाढणार की घसरणार?
२०१७ च्या पहिल्या तिमाहीपासून मागणीहून अधिक सोने आयात करण्यात येत होती. मात्र मंदीमुळे सराफ हे सोन्याचा जुना साठा विक्रीला काढत आहेत. त्यामुळे सोने आयातीचे प्रमाण कमी झाले आहे. सोन्याच्या किमती जास्तच राहणार असल्याची शक्यता सोमसुंदरम यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे चिंताजनक स्थिती आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याचे दर वाढत आहेत. मात्र गतवर्षीप्रमाणे सोन्याचे दर वाढणार नाहीत, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली.
दरम्यान, चीननंतर भारत हा सोन्याचा दुसऱ्या क्रमांकाचा उपभोक्ता देश आहे.