नवी दिल्ली - दूरसंचार नेटवर्कच्या सुरक्षेबाबत भारत कसलीही तडजोड करणार नसल्याचे केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी म्हटले आहे. तसेच डाटाचे सार्वभौमतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सच्या (सी-डॉट) ३६ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
हुवाईबाबत विचारले असता संजय धोत्रे म्हणाले, मी खात्रीने सांगू शकतो. आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. जगभरात डाटा वापरण्यामध्ये भारताचा आघाडीचा क्रमांक लागतो. त्यामुळे सर्व दूरसंचार विभागाचे तंत्रज्ञान व उत्पादनांमध्ये एकजिनसीपणा आणण्याची सूचना त्यांनी सी-डॉट संस्थेला केली होती.
डाटाची अधिक गरज वाढताना आपल्या दूरसंचार नेटवर्कला नवीन तंत्रज्ञानाची गरज लागणार आहे. सी-डॉटला हे काम करावे लागले, असे धोत्रे यांनी म्हटले होते. एकजिनसी तंत्रज्ञान आणि उत्पादनाशिवाय भारताची उभारणी शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले. सी-डॉटने वर्धापनादिवशी सॅटेलाईट वायफाय आणि इंटर ऑपरेटेबल सेट टॉप बॉक्स ही उत्पादने लाँच केली आहेत.
हुवाई आहे वादग्रस्त कंपनी-
देशात ५ जी नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी हुवाई दूरसंचार कंपनीने तयारी सुरू केली आहे. याबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. हुवाई कंपनीचे चीन सरकारबरोबर संबंध असल्याने काही देशात हुवाईच्या कामाबाबत तपास केला जात आहे. हुवाईची उत्पादने ही गुप्तचर विभागासाठी व नेटवर्कला हानिकारक असल्याचे अमेरिकेने वारंवार म्हटले होते. मात्र, हे सर्व आरोप हुवाईने फेटाळून लावले होते.