बंगळुरू (कर्नाटक) - भारतीय रिझर्व्ह बँक १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करणार आहे. ही माहिती आरबीआयचे महाप्रबंधक बी. महेश यांनी दिली. ते जिल्हापातळीवरील बँकिंग सुरक्षा आणि रोकड व्यवस्थापनाच्या बैठकीत बोलत होते.
आरबीआयचे महाप्रबंधक बी. महेश म्हणाले की, १०० रुपयांच्या जुन्या नोटा (महात्मा गांधी श्रेणी) चलनातून काढण्यात येणार आहेत. या श्रेणीमध्ये बनावट नोटांचे प्रमाण अधिक आहे.
आरबीआयने गेल्या सहा महिन्यांपासून जुन्या १०० रुपयांच्या नोटा छापणे बंद केले आहे. महात्मा गांधी श्रेणीतील १०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्या तरी लोकांनी चिंता करू नये. कारण १०० रुपयांच्या महात्मा गांधी श्रेणीतील नवीन नोटा सुरुच राहणार आहेत. आरबीआयने यापूर्वी २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. तर ५० पैशांबरोबर १, २, ५, १० आणि नुकतेच २० रुपयांची नाणे चलनात आणले आहे.
हेही वाचा-आरबीआयने स्टँडर्ड चार्टड बँकेला ठोठावला २ कोटींचा दंड
- आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार चलनातील नोटांचे मूल्य हे आर्थिक वर्ष २०२० मध्ये १४.७ टक्क्यांनी वाढले आहे. तर नोटांचे प्रमाण हे ६.६ टक्क्यांनी वाढले आहे.
- ५०० रुपये आणि २ हजार रुपयांचे प्रमाण हे २०२० मार्च अखेर एकूण नोटांमध्ये ८३.४ टक्के आहे. तर एकूण नोटांमध्ये ५०० रुपयांचे प्रमाण वाढले आहे.
- १० आणि १०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण हे मार्च २०२० अखेर एकूण नोटांपैकी ४३.४ टक्के आहे.
हेही वाचा-बजाज ऑटोच्या नफ्यात डिसेंबरच्या तिमाहीत २३ टक्क्यांची वाढ