नवी दिल्ली - करचुकवेगिरी करत असल्याच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने तामिळनाडूमध्ये छापे मारून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ७०० कोटींची अघोषित मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. प्राप्तिकर विभागाने ४. ५ कोटी रुपये कारवाई दरम्यान जप्त केले आहेत.
प्राप्तिकर विभागाने देशात ५५ ठिकाणी छापे टाकण्याच्या कारवाया केल्या आहेत. यामध्ये चेन्नई, कोईम्बतूर, थानजावूर आणि केरळ, आंध्र प्रदेश आणि गोवा या ठिकाणांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने ६ ऑगस्टला विदेशी मद्य कंपनीत झडती घेतल्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. कंपनीचे प्रवर्तक, महत्त्वाचे कर्मचारी आणि कंपनीचे पुरवठादार यांच्या निवासस्थानी झडती घेतली आहे.
गेल्या काही महिन्यापासून गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे छापे टाकण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी होत असल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे.
कंपनीचा कर्मचारी ४.५ कोटी रुपये कारमध्ये घेवून जात असताना प्राप्तिकर अधिकाऱ्याने त्याला ताब्यात घेतले. ती रक्कमही प्राप्तीकर विभागाकडून जप्त करण्यात आली आहे.