नवी दिल्ली – देशात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या चिनी कंपन्यांवर मोठी कारवाई करण्याचे मोदी सरकारने संकेत दिले आहेत. प्राप्तिकर विभागाने चिनी कंपन्या आणि त्यांचे भारतीय सहकारी यांच्या मालमत्तेवर छापे मारले आहेत. चिनी कंपन्यांनी बोगस कंपन्या स्थापून मनी लाँड्रिंग आणि हवालामधून पैसे हस्तांतरित केल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे.
काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) चिनी कंपन्यांशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तेवर छापे मारले आहेत. या छाप्यादरम्यान चिनी कंपन्यांच्या नावे 40 बोगस बँक खाती आढळल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. या बोगस बँक खात्यांमधून 1 हजार कोटींहून अधिक व्यवहार करण्यात आले आहेत.
चीनच्या कंपन्यांच्या मालकीच्या दुसऱ्या कंपन्यांनी बोगस 100 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम घेतल्याचे तपासात आढळले आहे. बँक कर्मचारी आणि चार्टड अकाउंट यांचा हवालामधून पैसे हस्तांतरण आणि मनी लाँड्रिगमध्ये समावेश असल्याचे आढळले आहे. यामध्ये हाँगकाँगमध्ये विदेशी चलनाचे व्यवहार झाल्याचा पुरावा आढळला आहे.
दरम्यान, चीनबरोबर पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने 59 चिनी अॅपवर बंदी लागू केली आहे. या कंपन्यांकडून देशाची एकता आणि सुरक्षितता यांना धोका निर्माण होत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते.