नवी दिल्ली – काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा, मिलिंद देवरा यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना पेटिंग विक्रीच्या प्रियांका गांधी व देवरा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
दिल्लीची सेवाभावी संस्था अखिल भारतीय शांती प्रतिष्ठानतर्फे वकील राजीव लोचन यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांसह राणा कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्यावर मनी लाँड्रिग, फसवणूक असे गुन्हे दाखल करावे, असे याचिकेत नमूद केले होते.
काय म्हटले होते याचिकेत?
पंतप्रधान राजीव गांधी यांनी आंतरराष्ट्रीय चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्याकडून पेटिंग खरेदी केले होते. या पेटिंगची विक्री प्रियांका गांधी वड्रा यांनी राणा कपूर यांना केल्याचा दावा करण्यात आला आहे. पेटिंगच्या विक्रीसाठी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस नेत्या वड्रा यांना मदत केल्याचा आरोप आहे. पेटिंग येस बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी राणा कपूरला 2 कोटीला विकल्याचा दावा याचिकेत करण्यात आला.
येस बँक घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायक्षेत्र असलेल्या सत्र न्यायालयात दाद मागावी, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट करत याचिका फेटाळली आहे. दरम्यान, येस बँक घोटाळ्यातील आरोपी राणा कपूर तुरुंगात आहे. येस बँकेतील घोटाळ्याचा सीबीआय व ईडीकडून तपास केला जात आहे.