नवी दिल्ली - चीनसह इतर देशांनी गुंतवणूक करून देशात रोजगार निर्मिती करावा, यासाठी भारताकडून प्रयत्न केले जातात. असे असले तरी ओयो या स्टार्टअपने भारतासह विदेशातही रोजगार निर्मिती करून दाखविला आहे. गेल्या १८ महिन्यात ओयोचा चीनमधील ३२० शहरांत विस्तार झाला आहे. यामुळे १ लाख जणांना रोजगार मिळाल्याचे ओयो कंपनीने म्हटले आहे.
ओयो ही चीनमधील ३२० शहरातील १० हजार नामांकित हॉटलमध्ये ऑनलाईन रुम बुक करण्याची नागरिकांना सुविधा देते.
कंपनीच्या यशाबद्दल बोलताना ओयो चीनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सॅश शिआह म्हणाले, ओयो जिवूद्दीन (हॉटेल) हे चीनी कंपनीसारखे चालविण्यात येते. त्यातून मध्यम उत्पन्न असलेल्यांना चांगल्या राहणीमानाचा अनुभव घेता येतो. ओयोमधील हॉटेलचे दर कमी असल्याने २० हजार जण रोज बुकिंग करतात. त्यातून चीनमध्ये आणखी रोजगार निर्माण होणार आहे. तसेच नव्या आर्थिक संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे ९७ टक्के फ्रँचाईज भागीदारांनी ओयोबरोबरील कराराचे नुतनीकरण केले आहे. सध्या ओयो ही २४ देशातील ८०० शहरामध्ये हॉटेल बुकिंगची सेवा पुरवित देत असल्याचे त्यांनी सांगितले.