नवी दिल्ली - पाकिस्तानी कंपनी हमदर्दने भारतात रुहअफ्जा हे थंडपेय पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात रुहअफ्जाची कमतरता असल्याचे माध्यमात वृत्त आले होते. त्यानंतर हमदर्द कंपनीने ट्विट करून रुहअफ्जाच्या पुरवठ्याबाबतची भूमिका मांडली आहे.
हमदर्द पाकिस्तानचे कार्यकारी उसामा कुरेशी यांनी रुहअफ्जा हे पेय वाघा सीमेवरून पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की आम्ही रुहअफ्जा आणि रुहअफ्जा गो हे पेय रमजानदरम्यान भारतात पाठवू शकतो. जर भारत सरकारने परवानगी दिली तर वाघा सीमेवरून ट्रकमधून रुहअफ्जा सहज पाठविणे शक्य आहे.
रुहअफ्जा हे गेली पाच महिने भारतीय बाजारपेठेमधून गायब झाल्याचे वृत्त माध्यमातून आले होते. तसेच हे पेय ऑनलाईनही उपलब्ध नाही. रुहअफ्जाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची टंचाई झाल्याने रुहअफ्जाचे उत्पादन कमी झाल्याचीही चर्चा आहे.
असे तयार झाले रुहअफ्जा
१९०० च्या दशकात युनानी चिकित्सा व्यापारी हकीम हाफिज अब्दुल मजिद जुन्या दिल्लीच्या लाल कुआ बाजारात हमदर्द नावाचा दवाखाना सुरु केला होता. १९०७-१९०८ या काळात मजिद यांनी दिल्लीच्या गर्मीपासून मुक्ती मिळवण्यासाठी रुहअफ्जा हे शीतपेय शोधून काढले होते. बघता बघता हे शीतपेय दिल्लीत लोकप्रिय झाले. मजिद यांचा दवाखाना या शीतपेयामुळे ओळखला जाऊ लागला. १९५७ पर्यंत या शीतपेयाने केवळ दिल्लीच नव्हे तर विदेशातही मजल गाठली. पण या दरम्यान झालेल्या भारताच्या फाळणीत हे शीतपेयही पाकिस्तानला गेले. मजिद यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हकीम महंमद सईद यांनी पाकिस्तानमधील कराचीला मुख्यालय केले. आता या कंपनीच्या अनेक शाखा आहेत.