नवी दिल्ली - 'निर्यात तयारी निर्देशांक २०२०' मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आणि तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू असल्याचे केंद्र सरकारची थिक टँक असलेल्या नीती आयोगाने म्हटले आहे. याबाबतचा अहवाल नीती आयोगाने आज जाहीर केला आहे.
समुद्र किनारा लाभलेल्या ८ पैकी ६ राज्ये हे निर्यात तयारी निर्देशांकात पहिल्या दहामध्ये आहेत. त्यामुळे समुद्रकिनारा असल्याने निर्यातीला चालना मिळत असल्याचे सूचित होते. तर समुद्रकिनारा नसलेल्या राज्यांमध्ये राजस्थानने निर्यात तयारी निर्देशांकात सर्वात चांगली कामगिरी केली आहे. तर त्यानंतर तेलंगणा आणि हरियाणाची चांगली कामगिरी आहे. अहवाल प्रसिद्ध करताना नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले, की निर्यात हा आत्मनिर्भर भारताचा एकसंध भाग आहे. देशाला निर्यात आणि जागतिक व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. येत्या वर्षांमध्ये भारताचे जागतिक व्यापारातील योगदान दुप्पट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
असे आहे दरडोई निर्यातीचे प्रमाण
- भारत- २४१ डॉलर
- दक्षिण कोरिया- ११,९०० डॉलर
- चीन- १८,००० डॉलर
देशामध्ये निर्यात वाढविण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. राज्यांनी निर्यात प्रोत्साहन वाढविण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करणे आवश्यक आहे. निर्यातक्षम तयारी निर्देशांकात धोरण, उद्योगांसाठीचे वातावरण, निर्यातीसाठीचे वातावरण आणि निर्यातीची कामगिरी या चार निकषांचा विचार करण्यात आला असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली.