नवी दिल्ली - केंद्र सरकार ग्राहकांना विक्रेत्यांकडून जीएसटीचे बिल घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता लॉटरी काढण्यावर विचार करत आहे. यामध्ये १० लाख रुपये ते १ कोटी रुपयापर्यंत लॉटरीचे बक्षीस ग्राहकांना मिळू शकणार आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क मंडळाचे (सीबीआयसी) सदस्य जॉन जोसेफ यांनी जीएसटी लॉटरीची माहिती दिली. ते म्हणाले, वस्तू व कर साम्राज्यात प्रत्येक ग्राहकाला लॉटरी जिंकण्याची संधी आहे. हे कर भरण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखे आहे. जीएसटीचे प्रत्येक बिल हे लॉटरीचे तिकिट मानण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकाला १ कोटी अथवा १० लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे ग्राहकाचे वर्तन बदलण्यासाठी असल्याचे जोसेफ यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोना विषाणुचा देशातील पर्यटनासह इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रावर परिणाम
ग्राहकाने खरेदी केलेले बिल हे पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर संगणकीकृत ड्रॉ काढून विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहे. लॉटरीसाठी लागणारा निधी हा ग्राहक कल्याण निधीमधून देण्याचा प्रस्ताव आहे. या निधीमध्ये नफेखोरीविरोधात केलेल्या दंड वळविण्यात येतो. आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी लॉटरी लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-जाणून घ्या, बँकेतील रकमेवर विमा संरक्षणाचा असा मिळणार फायदा