नवी दिल्ली - जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर कमी झाले आहेत. मात्र, वाढती वित्तीय तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढविले जाण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालातून ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जागतिक बाजारात खनिज तेलाच्या प्रति बॅरलचे दर ३० डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेच्या किमती १० ते १२ रुपये प्रति लिटरने कमी होवू शकतात. मात्र, सरकार पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यावर मर्यादा घालण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढविले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-कोरोनाने रुपयाच्या 'आर्थिक' आरोग्यावर परिणाम; डॉ़लरच्या तुलनेत ७० पैशांनी घसरण
केंद्र सरकारने शुक्रवारी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क ३ रुपये प्रति लिटरने वाढविले आहे. त्यामुळे सरकारला वर्षभरात सुमारे ४५,००० हजार कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार असल्याचे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असताना केंद्र सरकारच्या आर्थिक खर्चात वाढ होणार आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे महसुलाचे उत्पन्न घटल्याने यापूर्वीच सरकारला मोठी कसरत करावी लागली आहे.
हेही वाचा-बांधकाम उद्योग ठप्प; पॅकेज देण्याची क्रेडाईची सरकारकडे मागणी