नवी दिल्ली - कोरोनावरील लसीबाबत संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना सकारात्मक बातमी आहे. भारतीय औषध नियंत्रक महासंचालनयाने (डीजीएसी) पुण्याच्या सिरमला कोरोनावरील लसीची (कोविशिल्ड) दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार सिरमकडून लवकरच 4 हजार ते 5 हजार स्वयंसेवकांवर कोविशिल्डची चाचणी घेण्यात येणार आहे.
सिरमने ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लसीचे उत्पादन करण्यासाठी करार केला आहे. या करारामधून सिरम देशासाठी 1 अब्ज डॉलरच्या लसीचे उत्पादन घेणार आहे. तर त्यानंतर कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी लसीची निर्यात करणार आहे. देशात दोन लसींचे काम हे मानवावर चाचणी घेण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे.
कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट देशात येईल अथवा येणार नाही, यावर अंदाज व्यक्त करणे कठीण असेल, असे आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे. देशात कोरोनाबाधितांचा 2.11 टक्के मृत्यूदर आहे. हा जगातील कमी मृत्यूदरापैकी आहे. देशामध्ये दहा लाखांमागे 14 हजार 640 असे कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण आहे. असे असले तरी देशातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.