मुंबई - देशांतर्गत विमान वाहतूक सेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. कमी दरात विमान सेवा देणाऱ्या गोएअर इंडिया देशात विमानांची नव्या १०० सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे गोएअरच्या विमान वाहतुकीच्या संपर्कात ६०० शहरांची भर पडणार आहे.
देशात विमान वाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर विमान कंपनी गोएअरने सेवा पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे. गोएअरची विमानांची नवीन १०० उड्डाणे सुरू होणार असल्याने मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे, लखनऊ, नागपूर, वाराणसी यांच्या कनेक्टिव्हटीत भर पडणार आहे. जयपूर, पाटणा, रांची, गुवाहाटी, चंदीगड, श्रीनगर, लेह आणि जम्मू या ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
हेही वाचा-तुम्हाला युपीआयवरील आर्थिक व्यवहार मोफत आहेत की नाहीत? जाणून घ्या, सविस्तर माहिती
कोरोनाच्या पूर्वीच्या काळातील ४५ टक्क्यापर्यंतची गोएअरची विमान वाहतूक २१ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. तर १५ ऑक्टोबरपर्यंत गोएअरची विमान वाहतूक कोरोनाच्या पूर्वीच्या काळाच्या ६० टक्के होणार आहे. मागणी वाढत असल्याने देशातील विमान वाहतुकीत हळूहळू वाढ होत आहे. काही राज्यांनी टाळेबंदीचे नियम शिथिल करत वाहतुकीवरील निर्बंध काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मागणीत हळहळू वाढ होत असल्याचे गोएअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक खोना यांनी सांगितले.
हेही वाचा-व्होडाफोन उभारणार २५ हजार कोटींचा निधी; संचालक मंडळाची मंजुरी
नव्या विमान उड्डाणांमुळे देशातील विमान वाहतूक नेटवर्कच्या क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच पाहुण्यांसाठी (गेस्ट) प्रवास करण्याकरता अतिरिक्त आणि लवचिक प्लॅन उपलब्ध करून देण्यात आला आहे. ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कोणत्याही विमानांचे उड्डाण रद्द करण्यात येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगला अनुभव घेता येणार आहे. जर विमान उड्डाण रद्द झाले तर ग्राहकाला त्याचे त्वरित पैसे परत मिळणार असल्याचे गोएअरने म्हटले आहे.
गोएअरकडून मुंबई ते दिल्ली रोज विमान सेवा सुरू होणार आहे. तर मुंबईहून अहमदाबाद, चेन्नई, नागपूर, पाटणा, रांची, वाराणसी आणि जयपूरच्या विमान प्रवासाची सेवा रोज सुरू राहणार आहे. मुंबईहून लखनऊमध्ये आठवड्यातून चारवेळा विमान सेवा सुरू करण्यावरही कंपनी विचार करत आहे.