मुंबई - गो-एअरचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच तातडीने जमिनीवर उतरविण्यात आले. इंजिनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. हे विमान मुंबईहून लखनौच्या दिशेने जाणार होते.
एअरबस ए 320 मध्ये 178 प्रवासी असताना सुरक्षितपणे ते उतरविण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. लखनौच्या दिशेने जाणाऱ्या विमानासाठी संपूर्ण आपातकालीन स्थिती असल्याची घोषणा रात्री 7 वाजून 57 मिनिटाला करण्यात आली होती. पूर्वसावधगिरी म्हणून विमानाचे उड्डाण मागे घेण्यात आल्याचे गोएअर कंपनीने म्हटले आहे.
गोएअरच्या अभियंत्यांची टीम विमानाची तपासणी करून त्यामधील दोष दूर करणार आहे. त्यानंतर विमान सेवेत पुन्हा घेतले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.