पणजी - गोवा प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने मोरमुगाओ पोर्ट ट्रस्टमधील दगडी कोळशाच्या हाताळणीला बंदी घातली आहे. पणजी शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या वॉस्को बंदरावरील वायुप्रदूषण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आदेश दिल्याने जेएसडब्ल्यू स्टील कंपनीवर परिणाम होणार आहे. ही कंपनी साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेडची कंपनी आहे. या कंपनीकडून गोव्यातील दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येतो. त्यानंतर हा दगडी कोळसा हा उत्तर कर्नाटकमधील स्टील प्रकल्पात भट्टीचे इंधन म्हणून वापरण्यात येतो.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन गणेश शेटगावकर यांनी बंदराला कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. सोसाट्याचा वारा सुटत असल्याने दगडी कोळशाची राख ही स्थानिक परिसरात पसरली जात आहे. हवेचे प्रदूषण वाढत असल्याने विरोधी पक्षासंह स्थानिक लोकांनी बंदरातील दगडी कोळशाबाबत आंदोलने केली होती. कोळशाच्या राखेने आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याची तक्रार त्यांनी केली होती.
नोटीसमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत स्पष्टीकरणही मागविण्यात आले. २१ फेब्रुवारीपासून प्रदूषण नियंत्रण आणण्याची सूचना नोटीसमध्ये करण्यात आली आहे. मोरमुगाओ बंदरात सुमारे ७ मिलियन टन दरवर्षी दगडी कोळशाची हाताळणी होते.