नवी दिल्ली - कोरोना महामारीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. ईपीएफओने एप्रिल ते ऑगस्टमध्ये ३५ हजार ४४५ कोटी रुपयांचे ९४.४१ लाख कोटी दावे मंजूर केल्याची माहिती कामगार मंत्रालयाने दिली आहे.
चालू वर्षात एप्रिल ते ऑगस्टमध्ये ईपीएफओचे दावे मंजूर करण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी वाढले आहे. गतवर्षीच्या एप्रिल ते ऑगस्टच्या तुलनेत यंदा १३ टक्के अधिक रकमेचे वितरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटात आर्थिक संकटात सापडलेल्या सदस्यांना आगाऊ रक्कम आणि आजारासंबंधी दाव्यासाठी रक्कम वेगाने देण्यात आल्याचे ईपीएफओने म्हटले आहे. त्यासाठी ईपीएफओने स्वयंचलित पद्धतीने आगाऊ रक्कम देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ईपीएफओच्या सदस्यांना तीन दिवसांत खात्यावर रक्कम मिळत होती. यापूर्वी ही रक्कम मिळण्यासाठी २० दिवस लागत होते, असे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-स्टेट बँक ऑफ इंडिया देणार १४ हजार नोकऱ्या; कर्मचाऱ्यांना देणार स्वेच्छानिवृत्ती
ईपीएफओमध्ये कोरोनाच्या आजारासाठी आगाऊ रक्कम घेण्याचा पर्याय सुरू केला होता. त्यामधून सदस्यांनी एकूण ५५ टक्के रक्कम घेतली आहे. तर, इतर आजारांसाठी ३१ टक्के रक्कम घेण्यात आली आहे. कमी वेतन मिळणाऱ्यांना कर्ज न घेता आगाऊ पीएफची रक्कम घेण्याचा पर्याय मिळतो. त्यामधून समाजातील आर्थिक दुर्बल वर्गाला कठीण काळात सामाजिक सुरक्षा मिळत असल्याचे ईपीएफओने म्हटले आहे. कोरोनाचे सामाजिक आर्थिक परिणाम होत आहेत. हे परिणाम कमी करण्यासाठी ईपीएफओने ६ कोटी सदस्य, ६६ लाख पेन्शनर आणि १२ लाख कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे.
हेही वाचा-व्हिडीओकॉन घोटाळा: ईडीने दीपक कोचर यांना विशेष पीएमएलए न्यायालयासमोर केले हजर