नवी दिल्ली - बँक कर्मचारी संघटनांनी 31 जानेवारीपासून 2 दिवस देशव्यापी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. याच दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. वेतनवाढीचा पुनर्आढावा घ्यावा, अशी बँक कर्मचारी संघटनांची मागणी आहे.
सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित आहे. हा संप सरकारी बँकांच्या 9 संघटनांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँकेने (युएफबीयू) करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (एआयबीओसी), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि नॅशनल ऑरगिनॅझेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) या बँक कर्मचारी संघटनांचा समावेश आहे.
हेही वाचा-जीएमआर'चा ४९ टक्के शेअर टाटा ग्रुपच्या कंपनीला विकण्याचा निर्णय
यूएफबीयूची 13 जानेवारीला मुंबईत बैठक झाली. या बैठकीत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी व योग्य मागण्यांसाठी आक्रमक कार्यवाही करण्यावर बहुमत झाल्याचे फोरम ऑफ बँकेने म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनात 20 टक्के वाढ व्हावी, अशी बँक कर्मचारी संघटनेची मागणी आहे. 1 नोव्हेंबर 2012 ते 31 ऑक्टोबर 2017 च्या कालावधीसाठी बँक कर्मचाऱ्यांना 15 टक्के वेतनवाढ मिळाली होती. चालू महिन्यात देशातील 10 आघाडीच्या व्यापार संघटनांनी 8 जानेवारीला देशव्यापी संप पुकारला होता. या संपातही बँक कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा-आरसीईपीची दारे भारताने बंद केली नाहीत - परराष्ट्र व्यवहार मंत्री