नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांना बँकिंग व्यवस्था स्वच्छ करण्याच्या प्रयत्नांची किंमत चुकवावी लागली, असा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. याबाबतचे ट्विट गांधींनी केले आहे.
दिवाळखोरी कायद्यातील बदलाबाबत उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात आरबीआय आणि सरकारमध्ये कटुता निर्माण झाल्याच्या वृत्ताचा दाखला राहुल गांधींनी ट्विटमधून दिला आहे. बँकिंग व्यवस्था स्वच्छ करण्याची त्यांना नोकरीकरता किंमत चुकवावी लागली आहे. पटेल यांनी कर्जबुडव्यांना थांबवावे, असे पंतप्रधानांना वाटत नव्हते, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
यावर भाजपनेही राहुल गांधींवर पलटवार केला आहे. भाजपचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे, एका ओळीत संवेदनशील लिहिल्याने तुम्ही अर्थशास्त्रात तज्ज्ञ होत नाही. राहुल गांधींचे सल्लागार हे त्यांच्याएवढे अविचारी असतील याबाबत थोडा संशय आहे. असे मालवीय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात आरबीआयने दिवाळखोरीसाठी कठोर नियम लागू केले होते. तर सरकारने या कायद्यातील कठोर नियम वगळण्याचा निर्णय घेतला होता. यावरून केंद्र सरकार व भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये मतभेद होते. बँकिंग व्यवस्था स्वच्छ करण्याची किंमत तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांना चुकवावी लागल्याचे वक्तव्य आरबीआयचे माजी गव्हर्नर विरल आचार्य यांनीही केले होते.
दरम्यान, उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर आरबीआयच्या स्वायत्तेवरून सरकारवर निशाणा साधणाऱ्या डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी पदावरून राजीनामा दिला होता.