बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- देशात एकीकडे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असताना खाद्यतेलाच्या दरातही वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची दुहेरी झळ सोसावी लागत आहेत.
केंद्रीय सांख्यिकी विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने जानेवारीमधील ग्राहक किंमत निर्देशांकाची (सीपीआय) आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार खाद्यतेल आणि स्निग्धपदार्थांच्या (ऑईल आणि फॅट) किमती गतवर्षीच्या तुलनेत जानेवारीत १९.७१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. विविध वर्गवारीच्या श्रेणीच्या तुलनेत खाद्यतेल आणि स्निग्धपदार्थांमधील महागाई ही सर्वाधिक वाढली आहे. महागाईच्या वर्गवारीत पालेभाज्या, फळे, मसाले, डाळी, पादत्राणे आदींचाही समावेश होतो.
हेही वाचा-महामारीने रेल्वेच्या महसुलाला मोठा 'ब्रेक'; वर्षभरात ३६,९९३ कोटी रुपयांची घसरण
जानेवारी २०२१ मध्ये वाढले महागाईचे प्रमाण
खाद्यतेल, मांस आणि मासे (१२.५४ टक्के), अंडी (१२.८५ टक्के), मद्य (१३.१५) आणि डाळी (१३.३९ टक्के) असे महागाईचे प्रमाण वाढले आहे. जूनपासून खाद्यतेलाच्या दरात कमालीची वाढ झाल्याचे केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
- खाद्यतेलातील महागाईचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये १५.१७ टक्के, नोव्हेंबरमध्ये १७.८६ टक्के तर डिसेंबरमध्ये २० टक्के प्रमाण वाढले आहे.
- खाद्यतेल आणि स्निग्ध पदार्थाच्या वर्गवारीत वनस्पतीजन्य, शेंगदाणा, खोबरे अशा तेलांच्या महागाईच्या प्रमाणात ४.०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पालेभाज्या, दूध यांच्यातील महागाईचे प्रमाण जानेवारीत घसरले आहे.
हेही वाचा-औद्योगिक उत्पादनात डिसेंबरमध्ये १ टक्क्यांची वाढ
दरम्यान, किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण हे डिसेंबरमध्येमध्ये कमी होऊन ४.०६ टक्के झाले आहे. तर किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण हे नोव्हेंबरमध्ये ४.५९ टक्के होते.