वॉशिंग्टन - अमेरिका व चीनमधील व्यापारी युद्धाचा फटका अॅपल कंपनीला बसला आहे. अॅपलने कर टाळायचा असेल तर अमेरिकेत उत्पादन घ्यावे, अशी सूचना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ते व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात माध्यमांशी बोलत होते.
अॅपल कंपनीची उत्पादने अमेरिकेत तयार व्हावीत, अशी इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, अॅपलची उत्पादने चीनमध्ये तयार होवू नयेत, अशी माझी इच्छा आहे. ते अमेरिकेत उत्पादन घेणार असल्याचे समजले, तेव्हा ते योग्य असल्याचे मी सांगितले. तुम्ही चीनमध्ये उत्पादन घेऊ शकता. मात्र, अमेरिकेत उत्पादन पाठविताना आयात शुल्क द्यावे लागेल, असे त्यांनी बजावले आहे.
अॅपलचे प्रमुख टीम कुक यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचे ट्रम्प म्हणाले. मला वाटते, ते टेक्सामध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा करणार आहेत. जर ते तसे करणार असतील तर, मला खूप आनंद होईल.
अॅपलच्या चीनमधील उत्पादनांवर नवे आयात शुल्क लादण्यात येणार नसल्याचे नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. याबाबत त्यांनी भूमिका बदलली आहे. चीनमध्ये निर्मिती करण्यात येणाऱ्या अॅपलच्या 'मॅक प्रो' वरील आयात शुल्कात कोणताही दिलासा देण्यात येणार नाही. असे ट्विट ट्रम्प यांनी केले. हे उत्पादन अमेरिकेत घेण्यात यावे, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली. अमेरिकेत उत्पादन घ्या, कोणतेही आयात शुल्क लागणार नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.