नवी दिल्ली - विमानाच्या सुरक्षा-नियमांचे कठोरपणे पालन होण्यासाठी डीजीसीएने स्पाइसजेट कंपनीच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) स्पाइसजेटच्या चीफ फ्लाइट ऑपरेशन्स गुरुचरण अरोरा यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे. स्पाइसजेटच्या लेखापरीक्षणात डीजीसीएला अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
कोझीकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर विमान वाहतुकीचे नियमन करणाऱ्या डीजीसीएने देशातील सर्व विमान कंपन्यांचे लेखापरीक्षण सुरू केले आहे.
कोरोना महामारीत वाहतुकीवर निर्बंध असल्याने विमान कंपन्यांच्या उत्पन्नात घसरण झाली आहे. त्यामुळे ते पैसे वाचविण्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांचे लेखापरीक्षण करणे महत्त्वाचे झाले आहे. सर्व विमान कंपन्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करत आहेत की नाहीत, हे पाहणे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याशी ईटीव्ही भारतने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.