नवी दिल्ली - महानगरात घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात, हे नवे नाही. पण दिल्लीसह आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कार्यालय घेणे अत्यंत महागडे असल्याचे सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. दिल्लीत कॅनॉट प्लेसमधील कार्यालयांच्या भाड्याच्या किंमतीत आशिया पॅसिफिक प्रांतात चौथा क्रमांक आहे. तर मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पेलेक्स येथील कार्यालयांच्या भाडे किंमतीचा सातवा क्रमांक आहे.
हाँगकाँग, टोकियो आणि सिंगापूर या शहरांतील कार्यालयांच्या किंमती सर्वात अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. 'नाईट फ्रँक इंडिया' या कंपनीने आशिया खंडातील कार्यालयांसाठी लागणाऱ्या जागेबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.
दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये कार्यालयासाठी प्रति स्क्वेअर फूटला ३३० रुपये मोजावे लागतात. वर्षभरापूर्वी हा दर प्रति स्क्वेअर फूट ३२६ रुपये एवढा होता. उदाहरणार्थ कॅनॉट प्लेसमध्ये १००० स्क्वेअर फुटाचे कार्यालय घेण्यासाठी ग्राहकाला दर महिन्याला ३ लाख ३० हजार रुपये मोजावे लागतात. वर्षभरापूर्वी हाच भाड्याचा दर ३ लाख २६ हजार रुपये एवढा होता.
बंगळुरूच्या सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्टमधील (सीबीडी) कार्यालयाचे दर हे वर्षभरात १७ टक्क्याने वाढले आहेत. गेल्या वर्षी प्रति स्क्वेअर फूट १०६ रुपये असा भाडे दर असताना चालू वर्षात १२५ रुपये कंपन्यांना द्यावे लागत आहे. वांद्रे कुर्ल्यात कार्यालय भाड्याने घेण्यासाठी कंपन्यांना ३०० रुपये स्क्वेअर फूटप्रमाणे भाडे द्यावे लागते. हा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्क्याने वाढला आहे. उदाहरणार्थ १००० स्क्वेअर फूटच्या कार्यालयासाठी कंपनीला ३ लाख रुपये मासिक भाडे द्यावे लागेल.
नवे कार्यालय घेण्याच्या मागणीत १३ टक्क्याने वाढ झाल्याचे नाईट फ्रँक इंडियाचे चेअरमन शिषीर बैजल यांनी सांगितले. मुख्य ठिकाणी कार्यालयांची कमी उपलब्धता असते. अशा ठिकाणी कार्यालयाची सातत्याने मागणी होत असल्याने भाड्याचे दर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.