मुंबई - दिवाळीच्या तोंडावरच बँक कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. रविवारी सुट्टी, काल मतदानाचा दिवस आणि आज संपामुळे बँक बंद आहे. त्यामुळे सणासुदीत ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत.
विलीनीकरण आणि मुदत ठेवींवरील घटत्या व्याजदराविरोधात सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दिवाळी जवळ आल्याने खरेदी करायची असल्याने ग्राहक बँकांत जात आहेत. परंतु, सरकारी बँका बंद असल्याने त्यांची निराशा होत आहे. खरेदी कशी करायची हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
संपात दोन बँक कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे एका सरकारी बँकेची शाखा बंद तर दुसऱ्या बँकेची शाखा सुरू, अशी परिस्थिती आहे. संप अजून किती दिवस चालणार हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
हेही वाचा-बँक कर्मचारी संघटनेचा संप: बँकिंग सेवा अंशत: विस्कळित
बँक ग्राहकांमधून नाराजी व्यक्त-
संपाबाबत बँकेकडून माहिती देण्यात आली नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका ग्राहकाने सांगितले, आईला रुग्णालयात दाखल करायचे आहे. त्यासाठी पैसे लागायचे आहेत. पण बँक बंद असल्याने कुठे जावे, असा प्रश्न आहे. बँक कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न असल्याची भावना दुसऱ्या बँक ग्राहकाने व्यक्त केली. पीएमसीतील घोटाळ्यामुळे ग्राहक अडचणीत आहेत. अशा स्थितीत बँक बंद राहणार असल्याने लोकांचा बँकांवरचा विश्वास उडेल. सर्वसामान्यांना त्रास होत आहे. याबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही ग्राहकाने व्यक्त केली.