कोलकाता - कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी बँकेने खास योजना जाहीर केली आहे. सरकारी बँकेने लस घेणाऱ्यांना मुदत ठेवीवर जादा व्याज दर देणार असल्याचे जाहीर केले आहे.
लस घेणाऱ्या ग्राहकांना मुदत ठेवीवर ३० बेसिस पाँईटने जादा व्याजदर देण्याचे युको बँकेने जाहीर केले आहे. हा व्याजदर ९९९ दिवसांच्या मुदत ठेवीवर मिळणार आहे. ज्या ग्राहकांनी लशीचा किमान एक डोस घेतला आहे, त्यांच्यासाठी ही ऑफर असणार आहे. युको बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले, की कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही छोटी पावले उचचली आहे. लस घेतलेल्या ग्राहकांना ठेवीवर जादा व्याजदर मिळण्याची योजना ही ३० सप्टेंबरपर्यंत मर्यादित कालावधीसाठी आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचीही योजना जाहीर-
नुकतेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने इमन्यू डिपॉझिट स्किम योजना लाँच केली आहे. या योजनेत ग्राहकांना १,१११ दिवसांच्या मुदत ठेवीवर अतिरिक्त २५ टक्के व्याज दर देणार असल्याचे जाहीर केले आहे. ही योजना कोरोनाची लस घेतलेल्या ग्राहकांकरिता लागू आहे.
18 ते 44 वर्षे वयोगटाच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र घेणार
केंद्र सरकारच्या नव्या लसीकरण धोरणाप्रमाणे केंद्र सरकारकडून राज्यांसाठी लागणाऱ्या २५ टक्के लसीकरणाची खरेदीही करण्यात येणार आहे. ही लस केंद्र सरकारकडून राज्यांना १८ वर्षांहून अधिक वयोगटाला २१ जूनपासून देण्यात येणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने १८ ते ४४ वर्षे वयोगटाच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारवर सोपविली होती. केंद्र सरकारने नव्या लसीकरणाच्या धोरणात रुग्णालयांना असलेला २५ टक्के हिस्सा पूर्वीप्रमाणे कायम ठेवला आहे.
दरम्यान, देशात सुमारे २३.५९ कोटी जणांना कोरोनाची लस मिळाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.