बीजिंग/सॅनफ्रान्सिस्को - व्यापार युद्ध भडकले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या हुवाई उत्पादनावर बंदी घातली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अॅपलवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी चीनचे नागरिक सोशल मीडियामधून करत आहेत.
अॅपल व डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील मेसेज चीनच्या वूईईबो या सोशल मीडियावर फिरत आहेत.
चिनी नागरिकांच्या या आहेत सोशल मीडियावरील प्रतिक्रिया-
व्यापारी युद्ध पाहताना मला दोषी असल्यासारखे वाटत आहे. जेव्हा पैसे येतील तेव्हा आयफोन बदलणार असल्याचे एका वापरकर्त्याने वूईईबोवर म्हटले आहे. हुवाईचे ब्रँडिग अप्रतिम आहे. ते अॅपलचे आठ तुकडे करेल, असे दुसऱ्या वापरकर्त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. एवढा चांगला स्मार्टफोन असताना आपण अॅपल का वापरत आहोत, असा सवालही वापरकर्त्याने विचारला आहे. हुवाई ही अॅपलच्या आयफोनपेक्षा अधिक कार्यक्षम असल्याचे एका वापरकर्त्याने वूईईबोवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
हुवाईवर निर्बंध लादण्यासाठी ट्रम्प यांनी घोषित केली आणीबाणी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी घोषित केली आहे. या आणीबाणीमुळे अमेरिकन कंपन्यांना विदेशातील दूरसंचार उत्पादनांची आयात करता येणे अशक्य होणार आहे. हुवाईवर निर्बंध लादण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. तर विदेशातील कंपन्यांचा त्रास थांबवावा, अशी चीनने अमेरिकन सरकारकडे मागणी केली आहे. अमेरिकेला चिंता वाटणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत हुवाईने आपण खुले आहोत, अशी तयारी दर्शविली आहे.
अॅपलवर बहिष्कार टाकण्याचीही यापूर्वीही राबविण्यात आली होती मोहिम-
यापूर्वी चीनमध्ये नागरिकांनी अॅपलवर बहिष्कार टाका, अशी मोहिम राबविली होती. अॅपल टाळून हुवाई स्मार्टफोन विकत घेण्यासाठी चीनी कंपन्यांनी डिसेंबरमध्ये ग्राहकांना मोठ्या सवलती दिल्या होत्या. २० हून अधिक चिनी कंपन्यांनी हुवाईची उत्पादनांची खरेदी वाढविणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. चीनच्या न्यायालयाने डिसेंबरमध्ये आयफोनच्या बहुतांश मॉडेलच्या खरेदी व विक्रीवर बंदी घातली होती.
चीन-अमेरिकेमधील व्यापार युद्धावर ११ व्या फेरीदरम्यान कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर परस्पर देशांवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.