बीजिंग - गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता झालेले चीनचे प्रसिद्ध उद्योजक व आंत्रेप्रेन्युअर जॅक मा हे अखेर दिसले आहेत. त्यांनी व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट करून सर्व शंका-कुशंकांना पूर्णविराम दिला आहे.
जॅक मा यांनी ५० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये शिक्षकांशी संवाद साधला. गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता झाल्याबाबत त्यांनी व्हिडिओमध्ये कोणताही उल्लेख केला नाही. हा व्हिडिओ चीनची बिझनेस न्यूज आणि इतर वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या काळानंतर पुन्हा भेटू असे शिक्षकांना म्हटले आहे.
हेही वाचा-चांदी प्रति किलो १,००८ रुपयांनी महाग; सोन्यालाही दरात झळाळी!
कशामुळे गायब झाले होते जॅक मा?
- चीनच्या वित्तीय नियामक संस्थेवर जॅक मा यांनी २४ ऑक्टोबरला शाघांयमधील परिषदेमध्ये जाहीरपणे टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चीन सरकारने जॅक यांच्या अँट कंपनीचा प्रस्तावित आयपीओ रद्द केला होता. त्याचबरोबर जॅक मा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत.
- जॅक मा हे चीनच्या जागतिक बिझनेसमधील सेलिब्रिटी आणि टेक बुमचे प्रतिक मानले जातात. त्यांना चीन सरकारने कायदेशीर मुद्द्यावरून अटक केल्याची शक्यता जगभरात व्यक्त करण्यात येत होती.
- आंत्रेप्रेन्युर हे नियामक संस्थांना आवाहन देऊ शकत नाहीत, हे चीनमधील सत्ताधीश कम्युनिस्ट पक्षाने दाखवून दिले आहे. अलिबाबाचे रिटेलिंगमध्ये वाढते वर्चस्व आणि अँटकडून होणारी वित्तीय जोखीम यामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नाराज असल्याचे वित्तीय तज्ज्ञांना वाटते.
- चीनमधील वर्चस्ववादी नियामक संस्थेने अलिबाबाचे कार्यकारी अधिकारी आणि इतर तंत्रज्ञ अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. नव्या स्पर्धकांना बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी मोठ्या कंपन्यांनी अडथळे आणू नयेत, असे अलिबाबाच्या अधिकाऱ्यांना चीनच्या नियामक संस्थेने आदेश दिले होते.
जॅक मा यांनी महामारीत अनेक देशांना मदत केली आहे. ते बेपत्ता झाल्याने त्यांनी गुंतवणूक केलेल्या भारतीय कंपन्यांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा-'भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग होणे आवश्यक'