नवी दिल्ली - ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून राज्यांबरोबर वाद होत असताना केंद्र सरकारने महत्त्वाची निर्णय घेतले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ऑक्सिजन नेणाऱ्या वाहनांचे राज्यांतर्गत आणि जिल्हा सीमांवरील वाहतुकीचे निर्बंध हटविले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना वैद्यकीय ऑक्सिजन नेणाऱ्या टँकरच्या वाहतुकीत अडथळे येऊ न देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्याच प्रदेशातील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविण्याचे बंधन करता येणार नाही. जर यामध्ये त्रुटी आढळली तर स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा-मुंबईत वाहनांसाठी कलर कोड लागू; नागरिक स्वतःही स्टिकर चिटकू शकतात, मात्र खोटी माहिती असल्यास कारवाई
ऑक्सिजन नेणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीकरता जिल्हा दंडाधिकारी, उपआयुक्त, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस उपआयुक्त हे वैयक्तिकरित्या जबाबदार असणार आहेत.
हेही वाचा-मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर गुंडांची पोलिसांशी हुज्जत; हत्यारे असलेली कार सोडून फरार
पंतप्रधानांनी ऑक्सिजन उत्पादनासह पुरवठ्याचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्ये देशभरात पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. ऑक्सिजनचे उत्पादन, वितरण आणि आरोग्य यंत्रणेला ऑक्सिजन पुरविण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर करण्याचे आदेश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यांनी ऑक्सिजनचा साठेबाजी करू नये आणि ऑक्सिजनची वेगवान वाहतूक होऊ द्यावी, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
राज्यांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा दिल्याचा पंतप्रधान कार्यालयाचा दावा-
पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार 20 राज्यांनी प्रति दिन 6,785 मेट्रिक द्रवरुपातील वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी नोंदविली आहे. तर केंद्र सरकारने 21 एप्रिलपासून या राज्यांना 6,822 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. ऑक्सिजनच्या वेगवान वाहतुकीकरता ऑक्सिजन एक्सप्रेस या रेल्वेचा वापर करण्यात येत आहे. विझागवरून मुंबईला 105 मेट्रिक टन द्रवरुपातील वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचला आहे. रिकामे ऑक्सिजन सिलिंडर विमानाने ऑक्सिजन पुरवठादाराकडे नेण्यात येत आहेत. त्यामुळे वेळ वाचत असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.