नवी दिल्ली - कोरोनाच्या उपचाराबाबत आरोग्य मंत्रालयाने राज्यांना महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आंतरराज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यावर निर्बंध घालू नयेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना आदेश दिले आहेत. कोरोनाच्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणे ही प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे.
पुरेसा आणि विस्कळित न होणारा वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. काही राज्यांकडून विविध कायद्यांतर्गत वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर निर्बंध आणण्यात येत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा- कर्जदारांच्या समस्या विचारात घेण्याकरता केंद्राकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना
ऑक्सिजन सिलिंडरच्या उत्पादकांना त्यांच्याच कार्यक्षेत्रात असलेल्या रुग्णालयांना पुरवठा करणे बंधनकारक करण्यात येत असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अत्यवस्थ असलेल्या कोरोनाच्या रुग्णांचे व्यवस्थापन करताना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने टाळेबंदीचे नियम लागू करून आंतरराज्य वाहतुकीवर निर्बंध लादू नयेत, असे राज्यांना आदेश दिले होते.
हेही वाचा-महामारीत उद्योग सावरण्यास सुरुवात; प्रवासी वाहनांच्या विक्रीत १४ टक्क्यांची वाढ
दरम्यान, देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये रुग्णांचे प्रमाण ६० टक्के आहे. गेल्या २४ तासात देशात १ हजार २०९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. देशात शुक्रवारपर्यंत एकूण ७६ हजार २७१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात एकूण ९ लाख ४३ हजार ४८० कोराना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत एकूण ४५ लाख ६२ हजार ४१४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.