नवी दिल्ली - आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलचे विविध ग्राहक कंपन्यांकडे ३ हजार कोटी थकित आहेत. हे पैसे येत्या दोन ते तीन महिन्यात मिळतील, असा विश्वास कंपनीचे चेअरमन पी.के.पुरवार यांनी व्यक्त केला.
बीएसएनएलला दर महिन्याला मिळणारे उत्पन्न व खर्च यामध्ये ८०० कोटींची वित्तीय तूट भेडसावत आहे. आर्थिक संकटात सापडल्याने बीएसएनएलला कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर करणे कठीण जात आहे. बीएसएनएलने ५ ऑगस्टला कर्मचाऱ्यांच्या पगारी दिल्या आहेत.
बीएसएनएलचे चेअरमन पी.के.पुरवार म्हणाले, आमच्या विविध कंपन्या ग्राहक आहेत. त्यांच्याकडील ३ हजार कोटी रुपये मिळविण्यासाठी रोज पाठपुरावा करण्यात येत आहे. हे यश आम्ही मिळवित आहोत. पुढे ते म्हणाले, संपूर्ण रक्कम कधी मिळेल, हे सांगणे कठीण आहे. कंपनी ताब्यात असलेली विविध कार्यालये भाड्याने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामधून दरवर्षी १ हजार कोटी रुपये मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी २०० कोटी रुपयाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. बीएसएनएल अनेक कामे आऊटसोर्ट पद्धतीने देवून २०० कोटी रुपये वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. तर विविध प्रयत्नामधून १५ टक्के विद्युत बिल कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
बीएसएनएलला अंदाजित १४ हजार कोटींचा तोटा-
दूरसंचार विभाग बीएसएनएल आणि एमटीएनएलला अर्थसहाय्य करण्याची योजना तयार करत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बीएसएनएलला अंदाजित १४ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तर याच वर्षात १९ हजार ३०८ कोटींचा महसूल घटला आहे. बीएसएनएलमध्ये १ लाख ६५ हजार १७९ कर्मचारी सेवेत आहेत.