नवी दिल्ली - साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने चालू हंगामाकरिता साखर निर्यातीकरिता ६ हजार २६८ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहार समितीने (सीसीईए) घेतला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावकडेर यांनी सांगितले. ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाने ६० लाख टन साखरेवर निर्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति टनाला एकाचवेळी १० हजार ४४८ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान साखर कारखान्याच्या चालू हंगामासाठी २०१९-२० (ऑक्टोबर-सप्टेंबर) देण्यात येणार आहे. याचा फायदा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यांतील शेतकऱ्यांना होणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
गतवर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने ५० लाख टन साखरेवर अनुदान २०१८-१९ साठी जाहीर केले आहे.