नवी दिल्ली - रेल्वेची पुनर्रचना होणार असल्याने विविध विभाग रद्द होणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे मंडळाच्या सदस्य संख्या कमी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वे मंडळाच्या सदस्यांची संख्या आठवरून पाच होणार आहे.
रेल्वे मंडळात वाहतूक, ट्रॅक्शन आणि इंजिनिअरिंग यासाठी वेगवेगळे सदस्य आहेत. नव्या मंडळात केवळ पाच सदस्य असणार आहेत. त्यामध्ये संचलन, व्यवसाय विकास, पायाभूत आणि वित्त यांचे सदस्य असणार आहेत.
हेही वाचा-११० कोटींची फसवणूक; मारुतीच्या माजी एमडीविरोधात सीबीआयकडून गुन्हा
सध्या, भारतीय रेल्वेत विविध विभागाच्या आठ केडर सेवा आहेत. त्याऐवजी इंडियन रेल्वे सेवा ही एकच केडर असणार आहे. तर रेल्वेत केवळ रेल्वे सुरक्षा दल आणि वैद्यकीय सेवा विभाग असणार आहेत. तर इतर सर्व विभाग हे रेल्वे व्यवस्थापन व्यवस्थेंतर्गत येणार आहेत.
हेही वाचा-एअरटेल वाय-फाय कॉलिंगची सेवा मुंबईसह चार राज्यात सुरू; 'हे' आहे वैशिष्टय
रेल्वे मंडळाची पुनर्रचना होणार असल्याने विभागवाद (डिपार्टमेंटलिझम) संपणार आहे. तर काम सुरळीत चालणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. सूत्राच्या माहितीनुसार, वेगवेगळ्या विभाग आणि केडरमधील स्पर्धात्मक वाद संपणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या कामकाजाचे नुकसान होणे टळणार असल्याचेही सूत्राने सांगितले. विवेक देब्रॉय समितीने रेल्वे मंडळाची पुनर्रचना करण्याची २०१५ मध्ये शिफारस केली होती.