नवी दिल्ली - दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बीएसएनएल कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी संघटनांचा दिल्लीत आज आंदोलनाचा बारावा दिवस आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असेही बीएसएनल कर्मचारी संघटनेने आवाहन केले आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर धडक दिली आहे. दिल्लीत आंदोलन करणारे हजारो शेतकरी नवीन तीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी करत आहेत. बीएसएनएल एम्पलॉईज युनियन (बीएसएनएलईयू) संघटनेचा शेतकरी संघटनांच्या मागणींना पूर्ण पाठिंबा आहे. मागील संसदेमध्ये लोकशाहीविरोधी पद्धतीने कृषी कायदे मंजूर करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराचा नवा उच्चांक; ३४७ अंशाने वधारून गाठला ४५,४२६ चा टप्पा
कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या किमान आधारभूत किंमतही मिळणार नाही. सर्कल, जिल्हापातळीवर बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी निदर्शने करावीत, असे संघटनेने आवाहन केले आहे.
हेही वाचा-सोने प्रति तोळा १०४ रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही घसरण
विरोधी पक्षांनी आंदोलनाला दिला पाठिंबा-
शेतकरी आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी, डीएमके, एसपी, टीआर व कम्युनिस्ट पक्षाने रविवारी पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी संघटनांकडून ८ डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये हे पक्ष सहभागी होत आहेत.
शेतकरी व केंद्र सरकारमध्ये ९ डिसेंबरला पुन्हा होणार बैठक-
आंदोलक शेतकरी व केंद्र सरकारमधील चर्चा शनिवारी निष्फळ ठरली आहे. चर्चेच्या पाचही फेऱ्यांमध्ये शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी लावून धरली. सरकारने केवळ हो किंवा नाही, असे स्पष्ट उत्तर द्यावे, असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शेतकरी नेते व केंद्र सरकारमध्ये ९ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.