बंगळुरू – कोरोनावर बाजारात औषध उपलब्ध करणाऱ्या बिकॉनच्या चेअरमन किरण मुझुमदार-शॉ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.
किरण मुझुमदार-शॉ यांनी ट्विटमध्ये म्हटले, की कोरोनाची लागण झाल्याने मी कोरोनाबाधितांच्या संख्येत भर टाकली आहे. सौम्य लक्षणे आहेत. ते तसेच प्रमाण राहिल, अशी मला आशा आहे. त्यावर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी ट्विटला प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ऐकून दु:ख वाटले. तुम्ही लवकर बरे होण्याची गरज आहे. लवकरे बरे व्हा.
कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या बंगळुरूमध्ये -
दरम्यान, कर्नाटकमध्ये 17 ऑगस्टला सायंकाळपर्यंत एकूण 2 लाख 33 हजार 283 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 4 हजार 62 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या महामारीवर 1 लाख 48 हजार 562 जणांनी मात केल्याचे कर्नाटकच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाच्या रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण हे बंगळुरूमध्ये आहे. बंगळुरूमध्ये आजवर 91 हजार 864 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
कोण आहेत किरण मुझुमदार-शॉ
देशातील महिला उद्योजका बिकॉनच्या सीईओ किरण मुझुमदार-शॉ यांनी जागतिक जैवऔषध निर्मिती क्षेत्रात देशाचे नाव उंचावले आहे. यापूर्वी त्यांची 'मेडिसन मेकर पॉवर लिस्ट २०२०' मध्ये सहाव्यांदा निवड करण्यात आली आहे. त्यांनी नवसंशोधनातून तयार केलेल्या औषधामुळे अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत.
बिकॉनच्या औषधांचा कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारात होतो वापर-
डीजीसीआयने बिकॉनच्या इटोलिझुम्ब हे 25 मिलीग्रॅममध्ये कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर आपत्कालीन परिस्थिती वापरण्याची परवानगी दिली आहे. जगात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी जैविक औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी बायोकॉनच्या सायटोसॉर्ब या वैद्यकीय उपकरणाचा कोरोना रुग्णासाठी वापर करण्याला सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनामुळे अतिगंभीर असलेल्या रुग्णाचे अवयव निकामी होण्यापासून वाचविण्यासाठी या वैद्यकीय उपकरणाचा वापर करण्यात येतो..