हैदराबाद - बँकांमधील फसवणुकीच्या प्रकरणात 2019-20 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने वाढ झाली आहे. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवालात दिली आहे.
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये बँकांच्या फसवणुकीचे 8 हजार 707 प्रकरणे घडली आहे. त्यामधील फसवणुकीचे मूल्य हे 1.86 लाख कोटी रुपये आहे. तर आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये बँकांमध्ये फसवणुकीचे एकूण 6 हजार 799 प्रकरणे घडली आहेत. त्यामधून एकूण 71 हजार 543 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
काय म्हटले आहे आरबीआयने वार्षिक अहवालात?
- बँकांसह वित्तीय संस्थांकडून नोंदविण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रमाणात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- आरबीआयकडून 1 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या फसवणुकीची नोंद होते. त्यापेक्षा कमी रकमेची फसवणूक झाली तर आरबीआयकडून नोंद होत नाही.
- फसवणूक झालेली रक्कम म्हणजे तेवढ्या रकमेचे नुकसान नसल्याचेही आरबीआयने अहवालात नमूद केले आहे. काही रक्कम परत मिळविली जाते. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण कमी होते, असे आरबीआयने अहवालात म्हटले आहे.
- आर्थिक वर्ष 2019-20 मधील बँकांच्या फसवणुकीच्या एकूण प्रकरणात सरकारी बँकांचा 80 टक्के समावेश आहे.
- खासगी बँकांच्या फसवणुकीचे प्रकरणे ही 3 हजार 66 आहेत. यामधून आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 34 हजार 211 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. तर आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 6 हजार 742 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
- कार्ड अथवा इंटरनेटमधून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रमाणात ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.