नवी दिल्ली/मुंबई - ऑटो हब असलेल्या हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप अपेक्षित मताधिक्य मिळण्यापासून दूर आहे. दोन्ही राज्यामधील वाहन उद्योग अभूतपूर्व अशा संकटातून जात असल्याने त्याचाही फटका भाजपला बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा ही दोन्ही राज्ये ही उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या भारताची मिनी डेट्रॉईट म्हणून ओळखली जातात. हरियाणामध्ये मनेसर तर महाराष्ट्रात तळेगाव-चाकण हा २५ किमीचा ऑटो कॉरिडॉर आहे. या ऑटो हबमध्ये मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, होंडा मोटोरसायकल आणि स्कूटर, ओडी, स्कोडा, एम अँड एम, बजाज ऑटो, डायमलर बेन्झ अशा विविध कंपन्या आहेत. यामध्ये हजारो वाहनांचे सुट्टे भाग तयार करणारे हजारो उत्पादक कंपन्या आहेत.
हेही वाचा-वाहन उद्योगांवरील मंदीचे सावट कायम; प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग ११ व्या महिन्यात घट
मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा दोन्ही राज्यामधील वाहन निर्मितीला मोठा फटका-
मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा दोन्ही राज्यामधील वाहन निर्मितीला मोठा फटका बसला आहे. वाहन उद्योगातील मंदीने भाजपचे प्रचंड मताधिक्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
याबाबत बोलताना हिरो मोटोकॉर्प कामगार संघटनेचे महासचिव राजेश शुक्ला म्हणाले, मंदीमुळे भाजपची निवडणुकीत अपेक्षित अशी चांगली कामगिरी झाली नाही. मंदावलेली अर्थव्यवस्था आणि कर्मचारी कपातीमुळे अनेकजणांना समस्यांना सामोर जावे लागले आहे. त्यामुळे काही प्रमाणात भाजपच्या मतदानावर परिणाम झाला आहे.
हेही वाचा-'मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचे भारतात दिसणार स्पष्ट परिणाम'
भाजपचे २०० हून अधिक जागांचे उद्दिष्ट स्वप्न धुळीस-
हरियाणाची विधानसभा ९० सदस्यांची असताना भाजपला निम्म्याहून अधिक सदस्य निवडून आणता आले नाहीत. भाजपने ४० जागांवर आघाडी मिळविली आहे. हरियाणाचे मंत्री अनिल विज वगळता सर्व मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. भाजपने हरियाणा विधानसभेत ७५ जागांवर विजय मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. तर महाराष्ट्रात भाजपने २८८ जागांपैकी २०० हून अधिक जागा मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. प्रत्यक्षात भाजपला १०३ जागांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने ५७ जागांवर आघाडी मिळविली आहे.
वाहन उद्योगावर अवलंबून आहे महाराष्ट्र आणि हरियाणाचे अर्थकारण
वाहन उद्योगामधील काही तज्ज्ञ आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि हरियाणामधील बहुतांश अर्थकारण आणि रोजगार हे वाहन निर्मिती आणि संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे वाहन कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प काही दिवस बंद ठेवले. तर अनेक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. त्याचा देशातील इतर भागाहून अधिक वाईट परिणाम महाराष्ट्र आणि हरियाणात दिसून आला.
सप्टेंबरमध्ये सर्वच प्रकारातील वाहनांच्या विक्रीत २२.४१ टक्क्यांची घट-
वाहन उद्योगापुढे कमी झालेली मागणी, अधिक असलेला जीएसटी व कमी असलेला वित्तपुरवठा अशा समस्या आहेत. वाहनांचे उत्पादन आणि विक्री कमी झाल्याने नोकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्च्युअर्सच्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये सर्वच प्रकारातील वाहनांची विक्री कमी झाली आहे. हे वाहन विक्रीचे घटलेले प्रमाण २२.४१ टक्के एवढे आहे. वाहन उद्योगामधील सुमारे १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. याच परिस्थितीमध्ये बदल झाला नाही, तर १० लाख नोकऱ्यांवर संकट होईल, अशी भीती वाहन उद्योगामधून व्यक्त होत आहे.