कोलकाता - ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ मंत्री सोमवारपासून भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांची भेट घेणार आहेत.
अदानी यांच्या समवेतच्या बैठकीत ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ मंत्री हे ऑस्ट्रेलियातील कोळशाच्या खाणीच्या प्रकल्पाबाबत चर्चा करणार आहेत. हा प्रकल्प १० हजार कोटी रुपयांचा आहे. हा प्रकल्प अदानी ग्रुपने गुंतवणूकदार म्हणून लवकरात लवकर सुरू करावा, यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार प्रयत्न करणार आहे.
द-१० एमटीपीए हा कोळशाच्या खाणीचा प्रकल्प क्वीन्सलँडमध्ये आहे. कोळशाच्या खाणीमुळे ग्रेट बॅरियर रिफ या जागतिक वारसा असलेल्या स्थळाचे नुकसान होणार असल्याचा पर्यावरणवाद्यांचा दावा आहे. त्यामुळे त्यांनी अदानी ग्रुपच्या प्रकल्पाला विरोध केला आहे.
ऑस्ट्रेलियाचे संसधान मंत्री मॅथ्थ्यू कॅनवॅन हे अदानी यांची भेट घेणार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या राजदुताने सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या केंद्र व राज्य सरकारने कोळशाच्या खाणी प्रकल्पाला सर्व मंजुरी दिल्या आहेत. आता सर्वस्वी अदानी ग्रुपवर अवलंबून असल्याचे राजदुताने म्हटले आहे.
गेल्या नऊ वर्षापासून अदानी ग्रुपच्या प्रकल्पाला विरोध सुरू आहे. पर्यावरणवाद्यांकडून होत असलेल्या विरोधाबद्दल राजदूताने म्हटले की, मोठा प्रकल्प असल्याने काही प्रमाणात परिणाम होणार आहे. त्यामुळे साहजिकच विरोध होणार आहे. सरकारने पर्यावरणाला धोके तपासून मंजुरी दिली आहे. काही कट्टरवादी लोकांकडून खाण प्रकल्पाविरोधात मोहीम राबविण्यात येत असल्याचे अदानी ऑस्ट्रेलिया कंपनीने बुधवारी म्हटले होते.