नवी दिल्ली - यंदा ५ जी सुरू होण्यापूर्वी दूरसंचार कंपनी एअरटेल कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. एअरटेल संपूर्ण देशातील३ जी नेटवर्क सेवा २०२० पर्यंत बंद करणार आहे. एअरटेलने कोलकातामधून ३ जी नेटवर्क बंद करण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्येक व्यक्तीकडून किती सरासरी महसूल मिळतो आणि वस्तुस्थिती हे लक्षात घेवून निर्णय घेण्यात येत असल्याचे एअरटेलने म्हटले आहे. दूरसंचार उद्योग जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी सेवेच्या दरात सुधारणा करण्याची गरजही एअरटेलने व्यक्त केली.
कोलकातामधील काही भागातून ३ जी नेटवर्कची सेवा बंद करण्यात आली आहे. सप्टेंबरअखेर आणखी ६ ते सात सर्कलमधून ३ जी नेटवर्क बंद करण्यात येणार आहे. तर मार्चअखेर संपूर्णपणे ३ जी नेटवर्क बंद करण्यात येईल, अशी माहिती भारती एअरटेलचे सीईओ गोपाळ विठ्ठल यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, २ जीचे ५ जीमध्ये अद्ययावतीकरण करण्यासाठी काही पावले उचलणार आहोत. आमच्याकडे फक्त २ जी आणि ४ जीची सेवा असणार आहे. त्यामुळे आमचे सर्व स्पेक्ट्रम हे ४ जीमध्ये असणार आहेत. केवळ कमी प्रमाणात २ जीकरिता स्पेक्ट्रम वापरण्यात येणार आहे.
कंपनीच्या ४ जी ग्राहकांमध्ये ८.४ दशलक्ष ग्राहकांची भर पडली आहे. तर भारती एअरटेलच्या ग्राहकांकडून वापरण्यात येणारा डाटा प्रति माह ११ जीबी झाला आहे. भारती एअरटेलला जून तिमाहीदरम्यान धक्कादायकरित्या २ हजार ८६६ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या वर्षी जून तिमाहीदरम्यान एअरटेलने ९७ कोटींचा नफा मिळविला होता.