नवी दिल्ली - एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना विनावेतन पाच वर्षापर्यंत सुट्टी देण्याच्या निर्णयानंतर आणखी एक झटका दिला आहे. एअर इंडियाने नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची जाहिरात दिली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने वित्तीय आणि वैद्यकीय सेवा विभागांसाठी कर्मचारी नियुक्त करण्याची जाहिरात दिली आहे. कर्मचारी कपात आणि वेतन कपात होत असताना सामान्यतः कंपनीकडून नोकरीसाठी जाहिरात दिली जात नाही. मात्र इंडियाने हा समज खोटा ठरवला आहे
एअर इंडिया ठराविक कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना नियुक्त करणार आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि आणि वरिष्ठ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी नियुक्त्या करण्यात येणार आहेत. एअर इंडियात वित्तीय विभागात उपविभागीय प्रमुख, व्यवस्थापक आणि उपविभागीय व्यवस्थापक या पदासाठी जागा उपलब्ध आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने भत्त्यांमधील कपात आणि विनावेतन सुट्टी योग्य असल्याचे एअर इंडियाने म्हटले होते. वेतन भत्त्यात कपात केल्याने वैमानिक आणि अभियंत्यांनी यापूर्वी निदर्शने केली आहेत. अशातच कंपन्यांनी नवीन कर्मचारी नियुक्ती करण्याची जाहिरात दिल्याने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना वाढली आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.