नवी दिल्ली – कोरोनाच्या लढ्याकरता आरोग्याच्या पायाभूत सुविधांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक (एआयआयबी), जागतिक बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या आर्थिक सहकार्याने केंद्र सरकार महत्त्वाकांक्षी योजना राबविणार आहे. या 60 हजार कोटींच्या योजनेतून जिल्हा पातळीवरील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
एआयआयबी ही बहुस्तरीय कर्ज देणारी संस्था आहे. या संस्थेने कोरोनाच्या लढ्याकरता नुकतेच भारताला 1.2 अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे.
एआयआयबी उपाध्यक्ष डी. जे. पांडियन म्हणाले, की आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाकांक्षी योजनेबाबत भारत सरकारबरोबर चर्चा सुरू आहे. त्यामधून जिल्हापातळीवरील चाचणी करण्याच्या सुविधा या आयसीएमआरबरोबर जोडण्यात येणार आहेत. हा 8 अब्ज डॉलरचा प्रकल्प आहे. त्यामध्ये जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकही सहभागी होणार आहेत.
यावर्षीच योजना रुळावर आणण्याचे प्रयत्न
महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्रालया वित्तीय नियोजन करत आहे. जर सगळ्या गोष्टी सुरळित झाल्या तर चालू वर्षातच ही योजना वेगाने रुळावर येईल, असे एआयआयबीने म्हटले आहे. यापूर्वी एआयआयबीने 500 दशलक्ष डॉलर व 750 दशलक्ष डॉलरचे भारताला कर्ज मंजूर केल्याचे पांडियन यांनी सांगितले. दरम्यान, एआयआयबीचा संस्थापक असलेला भारत हा संस्थेचा सर्वात मोठा कर्जदार देश आहे