नवी दिल्ली - राजधानीतील ग्राहकांची अवस्था 'आगीतून फुफाट्यात' अशीच झाली आहे. कांद्याचे दर वाढले असताना टोमॅटोचा दर वाढून प्रति किलो ८० रुपये झाला आहे. स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांदे व टोमॅटोचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
आझादपूर बाजारपेठेतील व्यापाऱ्याच्या माहितीनुसार आवक कमी झाल्याने टोमॅटोचे दर वाढले आहेत. मदर डेअरीच्या सफल विक्री केंद्रात टोमॅटो प्रति किलो ५८ रुपयांनी विकले जात आहेत. तर स्थानिक भाजीविक्रेते प्रति किलो ६० ते ८० रुपये अशा दराने टोमॅटो विकत आहेत. गेली काही दिवस दक्षिणेतील कर्नाटक, तेलंगाणासारख्या राज्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-जिओच्या ग्राहकांना पहिल्यांदाच कॉलिंगकरिता मोजावे लागणार पैसे; 'हा' आहे नवा दर
असे आहेत महानगरात टोमॅटोचे दर (प्रति किलो)
- कोलकाता- ६० रुपये
- मुंबई - ५४ रुपये
- चेन्नई-४० रुपये
हेही वाचा-'मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचे भारतात दिसणार स्पष्ट परिणाम'
कांद्याचा दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी होवून प्रति किलो सुमारे ६० रुपये झाला आहे. नाफेड, एनसीसीएफसारख्या सरकारी संस्थांनी दिल्लीच्या बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारपेठेत कांद्याचा दर प्रति किलोला ६० रुपयांहून कमी झाला आहे. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारी संस्थांनी दिल्लीसह इतर बाजारपेठेत १८ हजार टन कांदा खुला केला आहे.