नवी दिल्ली - बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना चिंताजनक बातमी समोर आली आहे. येत्या पाच वर्षापर्यंत ८५ कोटी लोकांचे रोजगार हे मशिन घेणार आहेत. ही माहिती जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालात देण्यात आली आहे.
जागतिक आर्थिक मंचाने 'फ्युचअर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२०' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. आगामी काळात मशिन, मानव आणि अल्गोरिदमच्या वापराने नव्या स्वरुपाच्या ९७ दशलक्ष नोकऱ्या तयार होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. नोकऱ्यांची संख्या कमी होणार असली तरी नव्या नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. असे असले तरी नव्या नोकऱ्यांच्या निर्मितीचा वेग कमी असेल, असे अहवालात नमूद केले आहे.
२०२५ पर्यंत अनावश्यक नोकऱ्यांचे प्रमाण हे १५.४ टक्क्यांवरून ९ टक्के होणार आहे. तर व्यावसायिक नोकऱ्यांचे प्रमाण हे ७.८ टक्क्यांवरून १३.५ टक्के होणार आहे. या नोकऱ्यांसाठी नवीन कौशल्य लागणार आहेत. कोरोनाच्या काळातील मंदीमध्ये ऑटोमेशनचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कामगारांच्या संकटात आणखी भर पडली आहे. सुमारे ४३ टक्के उद्योगांनी मनुष्यबळात कपात करून तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे संकेत दिल्याचे जागतिक आर्थिक मंचाला सर्वेक्षणातून दिसून आले. तर ४१ टक्के उद्योगांनी विशिष्ट अशा कामांसाठी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२५ पर्यंत जेवढा वेळ मानव कामावर घालवितो, तेवढाच वेळ मशिन घालविणार आहेत. मशिनचा वापर वाढल्याने अनेक कंपन्या ठिकाण, पुरवठा साखळी आणि त्यांच्या मनुष्यबळात मोठा बदल करणार आहेत.