नवी दिल्ली - ५ जी नेटवर्कमध्ये चिनी कंपन्यांना सहभागी घेण्याबाबत भारताने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्याचे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले. ते 'रेज २०२०' या ऑनलाईन परिषदेत बोलत होते. ५ जीमध्ये सुरक्षा हीच मोठी चिंता असल्याचे कांत यांनी यावेळी म्हटले आहे.
विकासदर उंचावण्यासाठी भारताने ५ जी आणि कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे मत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले, की माझे वैयक्तिक मत आहे की आपण ५ जी तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा. मात्र, '५ जी'मध्ये सुरक्षा ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. ५ जीच्या चाचणीत चीनसह सर्व आघाडीच्या कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यांना ५ जीसाठी चाचणी करू द्यावी. त्यानंतर अंतिम निर्णय घ्यावा.
सरकारने ५ जी तंत्रज्ञानाच्या पुरवठादार कंपनी नोकिया आणि एरिकसनबरोबर चर्चा केली आहे. रिलायन्सने ओपन सोर्समधून स्वतंत्र ५ तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण ५ जी तंत्रज्ञान हे देशाच्या प्रगतीसाठी मुक्त झाले आहे. मात्र, हे तंत्रज्ञान भारतासाठी स्नेहपूर्ण असावे, असे कांत यांनी मत व्यक्त केले.
काय आहे ५ जी?
५ जी हे नवीन पिढीतील सेल्युलर तंत्रज्ञान आहे. यामध्ये ४ जीच्या तुलनेत १० ते १०० पट इंटरनेटला गती असते.
दरम्यान, ५ जी तंत्रज्ञान पुरविणारी हुवाई ही चिनी कंपनी अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. हा दावा हुवाई कंपनीने वेळोवेळी फेटाळून लावला आहे. हुवाई कंपनी भारतातही ५ जी तंत्रज्ञान पुरविण्यासाठी उत्सुक आहे.