नवी दिल्ली - महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी गुंतवणुकीच्या निर्णय प्रक्रियेत अजून मागे आहेत. गुंतवणुकीचा निर्णय घेताना ६४ टक्के पुरुष स्वतंत्रपणे निर्णय घेतात. तर केवळ ३३ टक्के महिला स्वतंत्रपणे निर्णय घेत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
गुंतवणुकीबाबत डीएसपी डब्ल्यूइनव्हेस्टर पल्सने नेल्सनसोबत सर्व्हे करण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या क्षेत्रात किरकोळ गुंतवणूकदार म्हणून महिलांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते.
सर्व्हेतून समोर आलेली माहिती -
बहुतेक महिला वडील अथवा पतीच्या आग्रहामुळे गुंतवणूक करतात. पतीच्या मृत्यूनंतर व घटस्फोटानंतर गुंतवणूक करण्यासाठी आग्रह करण्यात येतो, असे १३ टक्के महिलांनी म्हटले आहे. केवळ ३० टक्के महिलांनी स्वत:हून गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. मुलांचे शिक्षण, घर घेणे, मुलांचे लग्न, कर्जमुक्त आयुष्य आणि उच्च जीवनमान अशी स्त्री व पुरुषांची समान आर्थिक ध्येय असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे.
कार, घर अथवा गुंतवणुकीचा निर्णय घेताना पुरुषांचे वर्चस्व चालते, असे अहवालात म्हटले आहे. तर सोने-दागिने खरेदी तसेच दैनंदिन वस्तुंची खरेदी करताना स्त्रियांचे निर्णय प्रक्रियेत वर्चस्व असते. शेअर बाजार शेअर अथवा म्युच्युअल फंड खरेदी करताना केवळ स्वत:हून निर्णय घेणाऱ्या महिलांचे १२ टक्के प्रमाण आहे. तर ३० टक्के पुरुषांनी स्वतंत्रपणे निर्णय घेत गुंतवणूक केली आहे. या सर्व्हेसाठी ८ शहरातील ४ हजार १३ महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.