नवी दिल्ली - 26/11 ला दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबईने एकता, दयाळुपणा आणि संवदेनशीलता दाखविली होती. यामध्ये भविष्यातही मुंबईने सातत्य ठेवावे, असे उद्योगपती रतन टाटा यांनी आवाहन केले आहे.
रतन टाटा हे निवृत्तीनंतर समाज माध्यमात सक्रिय झाले आहेत. त्यांनी 26/11ला आज 12 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमात पोस्ट केली आहे. बारा वर्षापूर्वी जे प्रचंड नुकसान झाले, ते विसरण्यासारखे नाही. मुंबईतील लोक सर्व भेदभाव विसरून दहशतवाद संपविण्यासाठी एकत्रित आले, हे अधिक संस्मरणीय आहे.
हेही वाचा-Mumbai Terrorist attack : 26/11 हल्ल्याला 'तप' पूर्ण; जाणून घ्या मुंबईची सुरक्षा
पुढे ते म्हणाले, की ज्यांना गमावले आहे व ज्यांनी शत्रुवर मात करण्यासाठी धाडस करून सर्वोच्च त्याग केला आहे, त्यांच्याबद्दल आपण निश्चित शोक व्यक्त करू शकतो. मात्र, एकता, दयाळुपणा आणि संवदेनशीलतेचे कौतुक केले पाहिजे. त्यांना ह्रदयात जतन केले पाहिजे. येत्या वर्षातही प्रकाश उजळत राहिल, अशी आशा असल्याचेही टाटा यांनी नमूद केले.
हेही वाचा-'26/11' मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण; हल्ला झालेल्या ठिकाणची जाणून घ्या स्थिती
रतन टाटा यांच्याप्रमाणेच महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून 26/11च्या हल्ल्याबाबत भावना व्यक्त केली. मुंबईकर हे 26/11 चा हल्ला विसरू शकत नाहीत. तेव्हा अनिश्चितता आणि असुरक्षितता होती. देशावर आणि शहरावर हल्ला झाल्याचे तेव्हा वाटत होते, असे महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले. महिंद्रा यांनी ट्विटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे महान नेते नेल्सन मंडेला यांचे विचार दिले आहेत. धाडस असणे म्हणजे भीतीचा अभाव असणे असा अर्थ होत नाही. मात्र, त्या भीतीवर मात करणे असल्याचे महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
10 पैकी 9 दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी घातले होते कंठस्नान
26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला यावेळेस 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यात 197 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर, 300 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये केवळ भारतीय नाही तर परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या 10 पैकीं 9 दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले होते. या कारवाईमध्ये अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडला होता.