मुंबई - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रात विकासाला मोठी संधी आहे. त्यांनी जाहीर केलेल्या विविध तरतुदीमुळे उद्योग आणि पायाभूत क्षेत्राचाही विकास होईल, अशी प्रतिक्रिया टाटा ऑटो कॅम्प सिस्टमचे कार्यकारी संचालक अरविंद गोयल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना आणि त्यासोबतच रेल्वेसारख्या सार्वजनिक उद्योगांमध्ये विविध उद्योग समूहांना खासगी तत्त्वावर पार्टनरशिप करण्यासाठीचा विषय ही समोर आणला. त्यामुळे, देशातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असेही गोयल म्हणाले. यावेळी पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहनावर सरकारने मोठा भर दिला असल्याने त्यातून विविध प्रकारचे रोजगारही निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाहने खरेदी करण्यासाठीही काही सवलती देण्यात आल्या असल्याने या क्षेत्रातही चांगले परिणाम दिसतील. देशात सर्वत्र इलेक्ट्रिक वाहने चालण्यासाठी पंधरा वर्षाचा कालावधी लागेल. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यासाठी ऑटोमोबाईल क्षेत्राला वेगवेगळ्या डिझाइन तयार करावे लागतील. त्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे आणि यात आयटी क्षेत्राचीही खूप मोठी मदत होणार असून त्यातून देशात नवीन रोजगारांना चालना मिळण्याची शक्यता गोयल यांनी व्यक्त केली.