अमरावती - अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर यांना काँग्रेसमधूनच अंतर्गत विरोध सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांच्यात झालेल्या संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र, प्राध्यापक असणाऱ्या व्यक्तीला आपण कोणाशी काय बोलतोय, हे जर माहिती नसेल, तर त्यांनी प्राध्यापक पद आणि राजकारण सोडावे, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस सागर देशमुख यांनी केली आहे.
याबाबत सर्वात आधी 'ईटीव्ही भारत'ने वृत्त दिले होते. या प्रकरणात दोन्ही नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शेखावतांनी तो आवाज माझा नाही, असे म्हटले होते. तर सुर्यवंशी यांनी त्या क्लिपमध्ये माझा आवाज आहे. मात्र, मी कोणाशी बोललो हे मला माहिती नाही, असे विचित्र स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी अमरावती शहरातील काँग्रेस बुडविली. आता पुन्हा काँग्रेसविरोधात ते विरोधकांशी हातमिळवणी करून यशोमती ठाकूर यांच्या पराभवाचा कट रचतात. याचा आम्ही निषेध करतो, असे सागर देशमुख यांनी म्हटले आहे. आपण कोणाशी बोलतो हे जर आपल्याला आठवत नाही. तर, अशा व्यक्तीने प्राध्यापकी आणि राजकारण सोडून द्यावे, असेही सागर देशमुख यावेळी म्हणाले.